

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्याने क्षुल्लक कारणावरुन आपल्या बॅरेकमधील सहकैद्याच्या डोक्यावर जेवण वाढण्याच्या डवल्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी आरोपी न्यायाधीन बंदी राजू रविंद्र मारबते (वय २४) याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुरूवारी (दि.७) दुपारच्या सुमारास पोलिसांनी सर्व कैद्यांना बॅरेकमध्ये बंद केले. दरम्यान, कारागृहात असलेला न्यायालयीन बंदी क्रमांक ८४ राजू रविंद्र मारबते याने त्याच बॅरेकमध्ये असलेल्या महादेव वाशिराम कारमोरे (वय ३३) याच्या डोक्यावर हल्ला करुन जखमी केले. हा प्रकार घडताच बॅरेकमधील अन्य कैद्यांनी आरडाओरड केला. तेव्हा गस्तीवर असलेले पोलीस हवालदार शिवशंकर शहारे यांनी डोकावून पाहिले असता न्यायालयीन बंदी महादेव वाशिराम कारेमोरे याच्या डोक्यातून रक्त निघत असल्याचे दिसले.
अधिक माहिती घेतली असता आरोपी कैदी राजू मारबते याने क्षुल्लक कारणावरुन जेवण वाढण्याच्या डवल्याने महादेववर वार करत डोके फोडून जखमी केले होते. जखमी कैद्याला भंडारा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. याची तक्रार भंडारा पोलिसांत दाखल करण्यात आली असून भंडारा पोलिसांनी कलम ३२४ भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत.
हेही वाचलंत का ?