अकोले : ‘त्या’ अधिकार्‍याचा सेवा समाप्तीचा प्रस्ताव पाठविला | पुढारी

अकोले : ‘त्या’ अधिकार्‍याचा सेवा समाप्तीचा प्रस्ताव पाठविला

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अतिदुर्गम साम्रद आरोग्य उपकेंद्रात वर्षापूर्वी मृत झालेल्या भीमाबाई भिका रंगडे या महिलेवर समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनी कागदोपत्रीच उपचार केल्याचे दैनिक ‘पुढारी’ ने वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताची दखल आरोग्य विभागाने तत्काळ घेत समुदाय आरोग्य अधिकाऱी अविनाश पवार त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला असल्याची माहिती अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे यांनी दिली.

शासनाच्या नियमानुसार समुदाय आरोग्य अधिकारी यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करावी. तसेच पाठपुरावा सेवा द्याव्यात, योग्य उपचार करावे, आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी समुपदेशन करावे, तसेच वैद्यकीय सेवा पुरविणे. आजारांचे लवकर निदान, तपासणी व प्राथमिक उपचार करणे. रुग्णांच्या आजाराचा इतिहास घेणे, तपासणी करुन योग्य निदान व उपचार करणे, जनतेला 13 प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असल्याने साम्रद आरोग्य उपकेंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी मोठ्या प्रमाणावर दाखविण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनी साम्रद गावातील भीमाबाई भिका रगडे या 18 ऑगस्ट 2021 रोजी मृत झाल्याची नोंद असतानाही या मृत्यू पावलेल्या महिलेवर देखील कागदोपत्री दि.5 एप्रिल 2022 रोजी बाह्य रुग्ण तपासणीमध्ये सर्दी व डोके दुखीवर उपचार करण्यात आल्याची नोंद रजिस्ट्ररला करण्यात आली आहे.

दैनिक ‘पुढारी’ ने हे विदारक चित्र समोर आणत खोट्या रुग्ण तपासणीचा धक्कादायक प्रकार उघड करत आरोग्य विभागाचे भांडेफोड केले. दैनिक ‘पुढारी’ च्या या वृत्ताची दखल घेत समुदाय आरोग्य अधिकारी पवार यांना कायमस्वरूपी सेवा समाप्त करावे, असा प्रस्ताव जि. प. आरोग्य विभागाकडे तालुका आरोग्य विभागाने पाठविला आहे.

अविनाश पवार समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र साम्रद हे उपकेंद्रामध्ये नेहमीच वारंवार गैरहजर रहात असल्याबाबत तोंडी व लेखी सूचना देवूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. वैद्यकीय अधिकारी यांची दिशाभूल करण्याकरिता छोटी बाह्यरुग्ण नोंदी तसेच मृत व्यक्तींच्या नोंदी बाह्यरुग्ण रजिस्टरला घेण्यात आलेले आहे, असे चौकशीअंती निदर्शनास आले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून अविनाश पवार सतत गैरहजर असल्याचे व कामांत हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
श्याम शेटे , तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, अकोले.

Back to top button