भंडारा: बेपत्ता झालेल्या बालिकेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला

file photo
file photo

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील ८ वर्षीय बालिका सोमवारी (दि.२८) घराशेजारी खेळायला गेली होती. रात्र होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. अखेरीस आज (दि.३०) सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या स्थितीत गावाशेजारी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पापडा खुर्द हे गाव जंगलव्याप्त आहे. गावातील किशोर सिडाम यांची मुलगी श्रद्धा तिसरीच्या वर्गात शिकत होती. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सोमवारी शाळेला दुपारीच सुट्टी देण्यात आली. घरी आल्यानंतर बहिणीसोबत खेळून श्रद्धा साडेचारच्या दरम्यान शेजारी खेळण्यासाठी गेली होती. सायंकाळ होऊनही ती न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावात सर्वत्र शोध घेऊनही श्रद्धाविषयी कुणीही सांगत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी शोध मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. गावालगतच्या जंगलात अनेक वन्यजीवांचा वावर असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. सायंकाळपर्यंत श्रद्धाचा शोध सुरूच होता.

मंगळवारी पुन्हा संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित अधिकारी पापडा गावात ठाण मांडून होते. परंतु, बुधवारी सकाळी गावाशेजारी श्रद्धाचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या स्थितीत सापडून आला. हा प्रकार घातपाताचा असल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news