भंडारा, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. अस्मर यांनी २० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. निखीलेश सनी सयाम (वय २४ रा. कस्तुरबा गांधी वार्ड, भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, आई-वडील विभक्त झाल्याने तिसरीत शिकणारी अल्पवयीन मुलगी वडिलांकडे राहत होती. ७ मार्च २०१९ रोजी मुलीने वडिलांना निखीलेश सयामने केलेल्या मारहाण व अत्याचाराची माहिती दिली. वडिलांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली़. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधु यांनी केला.
याप्रकरणी आरोपी निखीलेश सनी सयाम याला अटक करण्यात आली. यानंतर त्याच्याविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडून साक्षीदार तपासले. आज जिल्हा सत्र न्यायलयाने आरोपी निखीलेश सनी सयाम याला २० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.