

Bacchu Kadu farmer loan waiver date:
माजी मंत्री, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी पुढारी न्यूजशी बोलताना राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ही घोषणा होण्यामागे रायगड उपोषण, अन्नत्याग आंदोलन आणि पदयात्रा यांसारख्या शेतकरी आंदोलनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकार "योग्य वेळेची" वाट पाहत होते, मात्र सर्व शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ती वेळ आत्ताच आणली, हे सर्वात मोठे यश आहे. सरकार कर्जमाफीच्या घोषणेपासून पळत होते, पण आम्ही बळाचा वापर करून त्यांना तारीख देण्यास भाग पाडले. "आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीमुळेच कर्जमाफीची तारीख खेचून आणली," असे कडू यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कर्जाचा हप्ता (पैसा) थेट बँकेत जमा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. "थोडी जरी इकडे-तिकडे नजर केली, तर खबरदार! आम्ही येथे उभे आहोत, आम्ही जिवंत आहोत," असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. गरज पडल्यास पुन्हा नागपूरमध्ये ‘शोले’ आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
कर्जमुक्तीसाठी 30 जून 2026 ही तारीख ठरवण्यामागे एक मोठी रणनीती असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. चालू वर्षातील (2025-26) कर्जदार शेतकरी 31 मार्च 2026 रोजी थकीत (NPA) होतील. जर ही घोषणा आताच केली असती, तर 2024-25 मधील कर्जदार वंचित राहिले असते. या तारखेमुळे, अतिवृष्टीने अडचणीत सापडलेला आजच्या वर्षाचा शेतकरीही या कर्जमाफीत समाविष्ट होईल.
इतर नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीवर 'फसवणूक' असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी, "त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसे वाटत असेल, आम्ही त्यांना समजून घेऊ," असे कडू म्हणाले.
कराळे मास्तर यांच्या नाराजीवर बोलताना, त्यांची मीटिंग नेमकी चुकल्यामुळे त्यांना तसे वाटत असावे. "ते एवढे लहान मनाचे लोक नाहीत, मी त्यांना भेटून समजून घेईन," असे आश्वासन त्यांनी दिले.
नागपूरमध्ये 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबद्दल त्यांनी, "गुन्हे दाखल केले असतील, तर अटक करा," असे आव्हान सरकारला दिले. कर्जमाफीसाठी लागणाऱ्या 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीवर सरकारला कर्ज घ्यावे लागेल की काय, या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले.
सरकारने आर्थिक मर्यादा सांगितली असली तरी, कडू यांच्या मते प्राधान्यक्रम बदलून (Priorities change करून) एका खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यावर वळवता येतात. "सरकारने कोणत्याही मार्गाने कमिटमेंट पूर्ण करावी," अशी त्यांची मागणी आहे.
या कर्जमाफीच्या तारखेचं श्रेय आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना, आंदोलक कार्यकर्त्यांना, आणि वामनराव चटप, जानकरांसह सर्व शेतकरी नेत्यांना देत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या सर्व नेत्यांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले.आंदोलनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली.
कर्जमाफीसोबतच इतर मागण्या (डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी, दिव्यांग, अंगणवाडी सेविका, मच्छीमार, मेंढपाळ) यांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी येत्या आठ दिवसांत पुन्हा एक बैठक होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.