Tukaram Mundhe | केवळ मतदान म्हणजे लोकशाही नव्हे, जागरूक नागरिकत्व महत्त्वाचे: आयएएस तुकाराम मुंढे!

'रिल्स'च्या आभासी जगापासून सावध राहा; तरुणांना मोलाचा सल्ला; अमरावती येथे 'संवाद तरुणाईशी' कार्यक्रमात मार्गदर्शन
IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe File Photo
Published on
Updated on

अमरावती : 'केवळ ८० टक्के मतदान होणे म्हणजेच लोकशाही नव्हे; तर ज्या लोकशाहीत नागरिक जागरूक असतात, तीच लोकशाही खर्‍या अर्थाने टिकते,' असे प्रतिपादन प्रामाणिक, शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी आयएएस तुकाराम मुंढे यांनी केले. अमरावती येथील पोटे इस्टेटमधील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित 'संवाद तरुणाईशी' या विशेष कार्यक्रमात ते तरुणांशी संवाद साधताना बोलत होते.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन, प्रशासकीय अनुभवांसोबतच लोकशाही, सामाजिक जबाबदारी आणि सोशल मीडियाच्या प्रभावावर अत्यंत अभ्यासपूर्ण व रोखठोक मते मांडली.

IAS Tukaram Mundhe
Tukaram Mundhe : व्यावसायिकांना त्रास देण्यासाठी एफडीएची कारवाई नाही', आयुक्त तुकाराम मुंढे यांची स्पष्टोक्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. जर हा अधिकार नसता, तर आपल्याला हवे ते शासन निवडता आले असते का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 'ऑफ़ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल' ही अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या सांगत, आपण केवळ घोषणा देण्यापुरते मर्यादित न राहता जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे मुंढे म्हणाले.

आजच्या डिझिटल युगात रिल्स आणि सोशल मीडियामुळे एकाच गोष्टीचा सातत्याने भडिमार केला जातो. यामुळे तीच गोष्ट खरी असल्याचा 'आभास' निर्माण होतो. अशा वातावरणात मूळ विचार दाबला जातो. 'आज आवाज वाढला पाहिजे की विचार?' असा प्रश्न उपस्थित करत मुंढे म्हणाले की, 'आपला विचार जर मोठा करायचा असेल, तर आवाज लहान करावा लागेल.' वाचलेली किंवा पाहिलेली गोष्ट खरंच खरी आहे का, हे तपासण्याची क्षमता प्रत्येक नागरिकाकडे असायला हवी.

तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, 'आपली इतिहासात नोंद व्हावी म्हणून काम करू नका. इतिहास केवळ अशाच व्यक्तींना लक्षात ठेवतो, ज्यांनी समाजाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.' यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला आदिंची प्रेरक उदाहरणे उपस्थितांसमोर ठेवली.

तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद

पोटे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि शहरभरातील युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान तुकाराम मुंढे यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना अत्यंत समर्पक, थेट आणि प्रेरणादायी उत्तरे देऊन तरुणांची मनं जिंकली. नेतृत्वगुण, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर यश कसे मिळवावे, याचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावतीतील तरुणाईला मिळाले. अमरावतीसह राज्यातील इतर जिल्हयातूनही विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news