

अमरावती: अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कारवाई ही कोणत्याही व्यावसायिकाला किंवा व्यवसाय चालकाला त्रास देण्यासाठी नसून, नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न तसेच औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आहे, अशी स्पष्ट ग्वाही एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. एफडीए कडून सध्या राज्यभर राबवल्या जाणार्या धडक मोहिमेबाबत अमरावतीत (दि.१) पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रशासनाची भूमिका आणि कारवाईमागचा हेतू स्पष्ट केला.
एफडीएच्या मोहिमांविषयी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, 'आमची कारवाई कठोरपणे सुरू आहे. परंतु, 'कठोर' कारवाईचा अर्थ व्यवसायिकांना त्रास देणे हा कधीच नसतो. कठोर कारवाई म्हणजे सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे होय. अधिकार्यांनी नियमानुसार आपले काम करायचे असून आम्ही एक नियामक म्हणून जबाबदारी पार पाडत आहोत.'
कारवाई करताना लहान किंवा मोठा व्यावसायिक, अथवा ठराविक भाग असा कोणताही भेदभाव केला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तक्रार किंवा माहिती आल्यानंतर त्याची योग्य शहानिशा करूनच नियमानुसार कारवाई केली जाते. जे कोणी कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावरच नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.