

Amravati Tiger conservation
अमरावती: वाघाची कातडी विक्री प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या ३ आरोपींना अटक करण्यात फ्रेजरपुरा पोलिसांना यश आले आहे. आरोपी आपली ओळख लपवून मध्यप्रदेशमध्ये राहत होते. अनिल भीमराव सरियाम (वय ३५, कुंभीखेडा, मुलताई ), सुनील बसंतीराम श्रीरामे, विजय साहेबराव बेले (वय २१, भेंबडी-वरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपूर्वी आरोपी अनिल सरियाम, सुनील श्रीरामे व विजय बेले यांच्या विरोधात वन्यप्राणी सुरक्षा कायदा अंतर्गत वाघाची कातडी काढून विकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. अनेक वेळा त्यांना समन्स व वॉरंट पाठवल्यानंतरही ते मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर झाले नाही. यामुळे न्यायालयाने त्यांचे विरोधात पकड वॉरंट जारी केला होता. फ्रेजरपुरा पोलिसांना त्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. पोलीसही त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान आरोपी मध्य प्रदेशात गेल्या चार वर्षापासून आपली ओळख लपून राहत आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी तिथे जाऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विचारपूस केली जात आहे. आरोपींना घेऊन पोलीस अमरावती शहरात दाखल झाले आहेत. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुराचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात वॉरंट टीम मधील सचिन, परवेज, विकी, शिल्पा यांनी केली.