

अमरावती : भरधाव अज्ञात ट्रकने मार्गावरील कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरूण गंभीर जखमी आहे. शनिवारी (दि.१६) मध्यरात्री अमरावतीत बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुपर हायवेवरील वडूरा गावाजवळ हा अपघात झाला. अजय रामखिलावन यादव (वय ३२, रा. देशमुख लॉन,अर्जुननगर), ऋषिकेश ज्ञानेश्वर कराळे (वय ३२, रा. अर्जुननगर), रजत मेश्राम (वय ३२, रा. माहुली जहागिर) अशी मृतांची नावे आहेत. तर सुनील लक्ष्मणराव गोंदुरवार (वय ३०, अर्जुननगर) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही तरुण कारने (क्र. एमएच २७ बीएल ६६९९) शनिवारी (दि.१६) रात्री बडनेरा सुपर हायवेवरून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने पाठिमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
दरम्यान अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. व रुग्णवाहिकेच्या मदतीने मृत व जखमींना तत्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अजय यादव, हृषीकेश कराळे, रजत मेश्राम यांना तपासून मृत घोषित केले, तर जखमी सुनील गोंदूरवार याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास बडनेरा पोलिस तपास करीत आहेत.