

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मद्यनिर्मितीसाठी आवश्यक मका साठवून ठेवलेली भलीमोठी टाकी अचानक फुटल्याने मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून चार कामगार ठार झाले. शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत शुक्रवारी (दि. १५) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जेसीबी आणि पोकलेनद्वारे मक्याचा ढिगारा बाजूला करून मजुरांचे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किसन सर्जेराव हिरडे (४५, रा. गोपाळपूर, नारेगाव), दत्तात्रेय लक्ष्मण बोदरे (३५, कुंभेफळ), विजय भीमराव गवळी (४५, अशोकनगर) आणि संतोष भास्कर पोपळघट (३५, रा. भालगाव), अशी मृतांची नावे आहेत.
मका साठविण्यासाठी लोखंड आणि अॅल्युमिनियमच्या ३ हजार मे. टनाच्या टाकीचे (सायलो) आयुष्य २५ वर्षे असते. मात्र ही टाकी १५ वर्षांतच फुटली.