अमरावती; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्याभरापासून थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले असून दिवसभर वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे सगळ्यांनाच हुडहुडी भरली आहे. शुक्रवारी सकाळी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील तापमान ८ अंशापर्यंत खाली उतरल्याची नोंद झाली. तापमानाने निच्चांक गाठल्यामुळे चिखलदऱ्यात चांगला गारठा निर्माण झाला असून सर्वत्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्याचा पारा १० अंशावर घसरल्याने जिल्हाही गारठून निघाला आहे.
शिवाजी कृषी महाविद्यालय प्रक्षेत्रातील तापमानाच्या नोंदीनुसार शुक्रवारी कमाल तापमान २९.५ तर किमान तापमान १०.७ डीग्री सेल्सीअस नोंदविले गेले. दक्षिण अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. एक नवीन पश्चिमी चक्रवात वायव्य भारताला भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसात विदर्भात किमान तापमानात २ डीग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही, अशी माहिती प्रा. अनिल बंड यांनी दिली. हिवाळ्यात जिल्ह्यातील चिखलदऱ्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद घेतली जाते. त्यामुळे येथील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक चिखलदरा येथे जातात. आता तापमानाने निच्चांक गाठल्यामुळे पर्यटकांमध्ये चिखलदऱ्यातील सैरसपाट्यासाठी आकर्षण वाढले आहे. अनेक जण चिखलदऱ्यातील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पोहचत आहेत. या वातावरणामुळे पर्यटकांना भुरळ घातली आहे. अशातच नववर्षाच्या स्वागताची तयारी चिखलदऱ्यात सुरु झाली असून, हॉटेल बुकिंग सुध्दा फुल्ल झाली आहेत.
हेही वाचा :