

अमरावती : तिवसा बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असलेल्या ५३ वर्षीय इसमाला भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने रविवारी (दि.१६) दुपारी भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील युवक आणि मुलगी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दुचाकीला पेट लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली.
मृतकाचे नाव संजय नामदेव पाटील (वय ५३, रा. शेंदुरजना माहोरा, ता. तिवसा) असे आहे. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव लक्ष्मी चौरागडे (वय १७, रा. नागपूर) आणि दुचाकीस्वार युवकाचे नाव राजेंद्र मोरे (वय १८, रा. अमरावती) असे आहे.
लक्ष्मी आणि राजेंद्र हे दोघेही अमरावतीवरून नागपूरकडे दुचाकीने जात असताना संजय पाटील हे तिवसा बसस्थानकासमोर महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणार्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती अपघातानंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेला आणि दुभाजकावर आदळल्याने क्षणात पेट घेऊन जळून खाक झाली.
अपघातानंतर जखमी लक्ष्मी चौरागडे आणि राजेंद्र मोरे यांना तसेच गंभीर स्थितीतील संजय पाटील यांना नागरिकांच्या मदतीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मी चौरागडे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला लागलेली आग तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. दरम्यान अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. या अपघाताचा पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.