

Amravati Wedding Attack
अमरावती : एका लग्नसोहळ्यात चचक नवरदेवावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला. लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवावर जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुन्या वादातून नवरदेवाच्या एका मित्रानेच चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा ड्रोनच्या सहाय्याने पाठलाग करण्यात आला. ते ज्या मार्गाने दुचाकीवरून पळून गेले ते ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या घटनेनंतर बडनेरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात नवरदेवाच्या हाताला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या नवरदेवाच्या नातेवाइकांनी आरोपी राजू बक्षी यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली आणि एक गाडी पेटवून दिली. या तोडफोडीप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बडनेरा पोलिसांनी हल्लेखोर राजू बक्षीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बडनेरा पोलिसांकडून सुरू असून मुख्य आरोपी राजू बक्षी याचा शोध घेतला जात आहे.