अमरावती, पुढारी वृत्तसेवा: वडीलच आपली गावात व नातेवाईकांकडे बदनामी करतात, असा समज झालेल्या मुलाने वडिलांची लोखंडी बत्त्याने वार करून निर्घृण खून केला. ही घटना जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या भामोद येथे मंगळवारी (दि.२२) उघडकीस आली. रामकृष्ण सदाशिव कात्रे (वय ६५, रा. भामोद) असे मृत वडिलांचे तर अतुल रामकृष्ण कात्रे (वय ३७) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले असून मुलगा देखील विवाहित आहे. मुलगा आणि सून दोघेही रामकृष्ण यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करीत नसल्यामुळे ते कधीकधी नातेवाईकांकडे राहायला जायचे तर कधी कधी मंदिर परिसरातही राहायचे. मुलगा व सून आपली योग्य प्रकारे देखभाल करत नाहीत असे ते गावात व नातेवाईकांकडे सांगत होते. याची माहिती त्यांच्या मुलाला होताच त्याने सोमवारी (दि.२१) वडील रामकृष्ण यांना बऱ्याच दिवसानंतर घरी आणले. रात्री शेतावर रखवाली करून मुलगा अतुल घरी आला. त्यानंतर त्याने वडिलांना गावात आपल्याबद्दल केलेल्या बदनामी बाबत विचारले. यावरून दोघांमध्येही चांगलाच वाद झाला. वाद चांगलाच विकोपाला गेला आणि त्यामुळे अतुलने वडील रामकृष्ण यांच्या डोक्यावर लोखंडी बत्त्याने वार करून त्यांची हत्या केली.
घटनेनंतर त्याने घरातून निघून जात आपल्याला काहीही माहीत नसल्याचा बनाव रचला. दरम्यान मंगळवारी (दि.२२) ही घटना उघडकीस येताच भामोद गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी या घटनेची माहिती येवदा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
याप्रकरणी मृतक रामकृष्ण यांची मुलगी मयुरी पंकज नागे (वय ३२, रा. चिंचोली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पोलिसांनी सर्व दिशेने तपास केला असता मुलगा अतुल याच्यावर संशयाची सुई येऊन पोहोचली. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असता त्याने आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगीतले. घटनेच्या वेळी आपण शेतात रखवालीला गेलो होतो,असे तो म्हणाला. दरम्यान पोलिसांनी रामकृष्ण यांच्या मुलींची चौकशी केली असता त्यांनी भाऊ अतुल वरच संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अतुलची कसून चौकशी केली. या दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अतुल याला अटक केली.
ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, पोलीस अमलदार सचिन पवार, त्र्यंबक मनोहर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, सागर नाठे, श्याम सोनवणे आदींनी केली.