अमरावती : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील टाकरखेडा संभु ते साऊर मार्गावर शनिवारी (दि.१९) मध्यरात्री घडली. रविवारी (दि.२०) पहाटे सात वाजता या दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्याच्या एका बाजूला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विलास शामराव चव्हाण (वय ४२) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, साऊर येथील रहिवासी विलास चव्हाण (वय ४२) हे काल (शनिवारी) सायंकाळी टाकरखेडा संभु येथे मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते. मोबाईल दुरुस्त करून रात्री साऊर येथे परत जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. रविवारी (दि.२०) सकाळी घटनास्थळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची दुचाकी देखील रस्त्याच्या एका बाजुला आढळून आली. माहिती मिळताच वलगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार वैभव पानसरे यांच्या नेतृत्वात पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.