

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने अमरावती आणि वर्धा परिसर हादरला आहे. धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक ९७ जवळ ट्रकने भाविकांच्या पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सुरुवातीला पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. या अपघातात १८ जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील भाविक शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. यासाठी त्यांनी बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केला होता. वाहनाला मागील बाजूस ट्रॉली जोडण्यात आली होती. रात्रीच्या वेळी हे वाहन समृद्धी महामार्गावरून तुलनेने कमी वेगाने पुढे जात असताना मागून आलेल्या १६ चाकी ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनातील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने बाहेर काढून धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारांसाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच दोन जणांचा मृत्यू झाला.
दत्ता कुरसंगे (५५)
प्रवीण बकाने (५०)
घनश्याम पाटील (६०)
गोलू ऊर्फ सचिन बादलमवार (३८)
ओम गावंडे (२२)
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या आणखी २ जणांची नावे उपलब्ध नाहीत.
दिनेश रामकृष्ण पोहणकर (३५)
नरेंद्र प्रल्हाद संयाम (४९)
मुनेश्वर देवराव ढोले (५३)
सागर मुनेश्वर ढोले (२७)
रोशन राऊत (२६)
सतीश वसंत राऊत (४३)
सतीश पांडुरंग खाडे (३५)
अनिल मारोतराव मसराम (४७)
दिनेश पांडुरंग नानवटे (४०)
नयन सुधीर खानजोडे (२९)
यश रवी मलकापुरे (३०)
अमित अनिल आडे (२५)
प्रतिक रामदास शिरसकर (३१)
अनुज अनिल आडे (२३)
दुर्गेश यशवंत भिसेन (३०)
आर्यन प्रभाकर वैद्य (१९)
शुभम शामसुंदर ढबाले (३०)
प्रणय प्रभाकर ढोले (३३)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक अनिकेत कदम आणि चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश ताथोड यांनी घटनास्थळी पाहणी केली. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे आणि मंगरूळ दस्तगीरचे पोलीस निरीक्षक आत्राम यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातामुळे वर्धा परिसरात शोककळा पसरली आहे. दुर्गादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.