अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बच्चू कडू हे वसुलीबाज असून लोकसभा निवडणुकीत त्यांना नवनीत राणा यांच्या पराभवासाठी मातोश्रीवरून रसद पुरवण्यात आली, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी सोमवारी (दि.१७) पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
वसुली आणि मांडवली करणारा माणूस कोणाच्याही संपर्कात राहू शकतो, अशा माणसाला नीतिमत्ता नसते. अचलपूरच्या जनतेला सर्व माहीत झालं आहे. त्यांचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि पडद्यामागचा चेहरा वेगळा आहे. त्यामुळे आमदार कडू यांनीच नवनीत राणांना पाडण्यासाठी मातोश्रीवरून रसद घेतली, असे आमदार राणा म्हणाले.
मी स्वतः या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. कोणावरही माझा आरोप नाही. सर्व समाजाचे मी आभार व्यक्त करतो. मात्र ज्या पद्धतीने काही लोकांनी आपल्या राजकीय पोळ्या शेकल्या आहेत, ते पाहता त्या त्या मतदारसंघातील जनता त्यांचा हिशोब नक्की घेईल, असेही रवी राणा म्हणाले.
नवनीत राणा सारखा सक्षम उमेदवार लोकसभेत पाठवायचा होता. मात्र त्यांना पाडण्यासाठी निवडणुकीत वेगळे चित्र दिसून आले. संविधानासंदर्भात अपप्रचार करून मतं मिळविण्यात आली. आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार उभा न करण्यासाठी माझ्यासोबत देखील बार्गेनिंग केली होती, असा आरोपही रवी राणा यांनी केला. दरम्यान रवी राणा यांनी आपण युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडतो आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये असल्यामुळे त्या त्यांच्या पक्षाच्या वतीने लवकरच स्वतंत्र भूमिका लोकसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात मांडतील, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात नवनीत राणा यांनी खासदार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विकास केला. अमरावतीचे नाव देशपातळीवर मोठं केलं. या लोकसभा निवडणुकीत त्या निवडून आल्या असत्या, तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद देखील मिळाला असतं, असे देखील आमदार रवी राणा म्हणाले. नवनीत राणा यांच्या पराभवाचे दुःख आम्हाला आहे. ज्यांनी दगा दिला त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विजयात आंबेडकरी जनता आणि मुस्लिम समाजाच्या मतदारांचा सिंहाचा वाटा होता. मी स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतो. असं असताना देखील विरोधकांनी केलेल्या अपप्रचारामुळे दोन्ही समाज आमच्यापासून दुरावले. मात्र अमरावती विधानसभेतून काँग्रेसच्या उमेदवाराला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावतीतून मुस्लिम समाजाच्या वतीने काँग्रेसकडे उमेदवारी मागितली जाणार आहे. अमरावती विधानसभेतील मुस्लिम समाजाची लोकसंख्या पाहता येथील आमदार मुस्लिम समाजाचा होऊ शकतो, अशी शक्यताही आमदार राणा यांनी यावेळी वर्तवली.
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी झाले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, डॉ.सुनील देशमुख, बबलू देशमुख यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच वानखडे यांचा विजय झाला. बळवंत वानखडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना कुठलीही अडचण असली तर मी मदत करेल. मात्र या निवडणुकीत काँग्रेसची मंडळी ज्याप्रमाणे प्रामाणिक होती त्याप्रमाणे आमच्यासोबत असणाऱ्यांची भूमिका प्रामाणिक नव्हती, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.