

Raju Shetti meet Bacchu Kadu
अमरावती: माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, सरकार ज्या प्रकारे परिस्थिती हाताळते आहे, ते पाहून अत्यंत चिड आणणारे किंवा निषेधार्थ आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शनिवारी (दि. १४) राज्यभर आंदोलन करून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (दि.१२) दिला. बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील अन्न त्याग आंदोलनाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सरकारमध्ये, विधिमंडळामध्ये वीस वर्षांपासून काम करणारा नेता असूनही त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहेत. शेतकरी, दिव्यांग यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू आहे. काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात अकोला येथे आले होते. मात्र त्यांना बच्चू कडू यांची चौकशी करावीशी वाटली नाही. अमरावतीचे पालकमंत्री नागपूरला राहतात. मात्र, त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार चिड आणणारा आहे, असेही शेट्टी म्हणाले.
बच्चू कडू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसह दिव्यांगांच्या मागणीवर ठाम आहेत. आज मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होते आहे. या बैठकीत काही निर्णय होते काय ते बघू. अन्यथा शनिवारी राज्यभर बंद होईल, रस्त्यावर कोणीही फिरणार नाही. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सर्व राजकीय पक्ष संघटना यांनी एकत्रित यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, गुरुवारी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला छत्रपती संभाजी राजे, रोहित पवार, खासदार अमर काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.