

Amravati Nagpur Highway Incident
अमरावती : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागले असून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. १२) अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू हे गुरुकुंज मोझरी येथे मागील ८ जूनपासून शेतकरी, दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलन करत आहे. दरम्यान, आज गुरुवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने व सरकारकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही कार्यकर्त्यांनी झाडाच्या फांद्या रस्त्यावर आणून टाकल्या आणि त्यांनाही पेटवून दिले. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. राज्यातील राजकीय पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपला पाठिंबा दिला आहे.
बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तज्ञ डॉक्टरांचे एक पथक आंदोलन स्थळी तैनात केले आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.