

Online Arms Selling Racket Exposed 7 deadly weapons seized
अमरावती, पुढारी वृत्तसेवा :
शहरात ऑनलाईन पद्धतीने घातक शस्त्रे मागवून विक्री करणार्या युवकाला गुन्हे शाखा युनिट-२ ने गजाआड करत ७ घातक शस्त्रे आणि मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ऋषी शंकर गोहर (वय १९, रा. बेलपुरा) हा ब्लु डार्ट कुरिअरमार्फत शस्त्रांची मागणी करून विक्री करत आहे. या माहितीवरून, पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकून एक लोखंडी तलवार आणि कोयता जप्त केला.
त्याच्या मोबाईल तपासात ‘टॅक्टॉय’ या ऑनलाईन साईटवरून तीन चाकू मागविल्याचे आढळले. हे चाकू ब्लु डार्टच्या अमरावती कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. तसेच यापूर्वी मागविलेले दोन चाकूही जप्त करण्यात आले. त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, चायना चाकू व मोबाईल असा एकूण १० हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी ऋषी गोहर याच्यासह ‘टॅक्टॉय’ कंपनीकडून चाकू पाठवणारा भारत नवजी (रा. सनवाडा, राजस्थान), शिप रॉकेट व टीटीआय या कंपन्यांचे मालक, ब्लु डार्ट गुरुग्रामचे सिक्युरिटी मॅनेजर विशालसिंह चौहान आणि अमरावती कार्यालयाचे मॅनेजर भोलेश्वरदास बघेल यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात कलम ४/२५, आर्म्स अॅक्ट व मपोका कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, अमोल कडू, पोलिस उपनिरीक्षक वानखेडे, सुनील लासुरकर, गजानन ढेवले, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संभे, विशाल वाकपांजर, राहुल ढेंगेकार, चेतन शर्मा यांच्या पथकाने केली.