

अमरावती : शहरातील संत कबीरनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या मोठ्या बहिणीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने, नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय सलोनी विजय मोहोड या अल्पवयीन मुलीने गळफास लावून आपले जीवन संपवले. अवघ्या आठ महिन्यांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलींनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलोनीचे वडील विजय मोहोड यांचे आधीच निधन झाले आहे. आठ महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीनेही जीवन संपवले होते, ज्या धक्क्यातून सलोनी अद्याप सावरली नव्हती. सलोनी आपल्या आईसह अमरावतीतील संत कबीरनगर येथे आत्याच्या घरी राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती. मंगळवारी (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास, मामा कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आत्या घरातील कामात व्यस्त होत्या. याच संधीचा फायदा घेत सलोनीने आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटना समजताच गाडगे नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. बहिणीच्या निधनाचे दुःख हे प्राथमिक कारण वाटत असले तरी, सलोनीने नक्की कोणत्या विवंचनेतून हे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.