

Amravati missing minor girl found
अमरावती : राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तमिळनाडूत शोध लावून तिला सुखरूप अमरावतीत आणण्यात पोलिसांना यश आले. विधी प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
बहलोलपूर परिसरातील ५० वर्षीय महिलेने १६ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती की, तिची १७ वर्षीय मुलगी राजापेठ येथील होप हॉस्पिटलमधून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विपुल हुलावले यांच्याकडे सोपविला.
तांत्रिक तपासादरम्यान मुलगी तमिळनाडूतील कोयंबटूर येथे असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलीस पथक तेथे रवाना झाले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुलगी तेथून निघून गेल्याचे समोर आले. पुढील तांत्रिक तपासात ती चेन्नई एग्मोर एक्सप्रेसने तिरुचिरापल्लीकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. राजापेठ पोलिसांनी तात्काळ तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानकावरील जीआरपीशी संपर्क साधून मुलीचा फोटो पाठविला व तिला ताब्यात घेण्याची विनंती केली. जीआरपी तिरुचिरापल्लीने तत्परता दाखवत मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता, आईशी झालेल्या वादामुळे रागाच्या भरात घर सोडल्याचे मुलीने सांगितले. कायदेशीर प्रक्रियेनुसार मुलीला तिरुचिरापल्ली येथील बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी पोलिस पथक तिला अमरावतीत घेऊन आले आणि तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षित ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विपुल हुलावले, मिलिंद हिवरे, अमित बकातवार, प्रशांत बेलोरकर, भाग्यश्री पालवदे व सुषमा आठवले यांनी पार पाडली.