

अमरावती : अंजनगाव-आकोट महामार्गावरील भंडारज येथे मंगळवारी (दि. २४) दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. राज्य परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत.
अंजनगाव सुर्जी येथून आकोटकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग क्र. ५७२ वर भंडारज गावाजवळ दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. आकोटकडे जाणारी एसटी बस (MH 20 GC 3932) आणि समोरून येणारी भरधाव कार (MH 27 GE 8081) यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून एसटीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात कारचालक शालिग्राम वानरे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील नुकतेच लग्न झालेले प्रथमेश वानरे (वय ३०), उत्कर्षा वानरे-कडू (वय २७) या नवदाम्पत्यासह कुसुम वानरे (वय ६०), रुखमाबाई गवई (वय ७०) सर्व राहणार अकोट हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंजनगाव ग्रामीण रुग्णालयातून उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय अचलपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. एसटी बसमधील वंदना पिंपळकर (वय ३५), रमेश रामचंद्र पिंपळकर (वय ७०रा.अचलपुर) हे सुद्धा गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.