

अमरावती: शहर गुन्हे शाखेने घरफोडी करणार्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले. अटक केलेल्या चार आरोपींनी शहरातील तब्बल २७ घरफोडींची कबुली दिली. आरोपींकडून सोने, कार, रोख असा एकुण २१ लाख ३६ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे येथील महिला न्यायाधिशांच्या घरी झालेल्या चोरीचा देखील उलगडा झाला आहे.
अमोल पाटील (वय ३२), सागर देवरे (वय ३०, दोघेही रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव), निखिल उर्फ पिस्तुल पाटील (वय २४, रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) व मिलिंद खैरनार (वय २९, नोळवा, ता. पळसाना, सुरत) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महिलेचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिणे व नगदी असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सर्व आरोपी निष्पन्न केले. चारही आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी अमरावतीत आणण्यात आले.चारही आरापी हे आंतरराज्यीय टोळीतील सदस्य आहेत. त्यांना जळगाव तसेच सुरत येथून ताब्यात घेण्यात आले.
तत्पुर्वी गुन्हे शाखेचे पथक दहा दिवस जळगाव व सुरत भागात त्यांच्या मागावर होते. ते राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत असल्याने त्यांना पकडणे आव्हानात्मक होते. तरी पोलिसांनी त्यांना पकडले. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हान यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षक महेश इंगोले व मनीष वाकोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
आरोपींकडून १२० ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, चार मोबाईल, कार, सहा लाख रुपये रोख, डोंगल, वायफाय राउटर, मिर्ची स्प्रे तथा चारचाकी वाहनाच्या १४ बनावट नंबर प्लेट जप्त केल्या. चारही आरोपींविरूद्ध जळगाव, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अकोलासह भावनगर गुजरात येथे घरफोडीचे ७२ गुन्हे दाखल आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. आरोपींनी चोरी केलेले सोने हे वेळोवेळी जळगाव येथील सोनार मनकेंद्र सुबल मैती व जामनेर येथील सोनार रोहीत जाधव यांना विक्री केले होते.