

अमरावती : अनुदानित शाळा असताना, शाळेची नियमबाह्य फी म्हणून लाच स्वीकारणाऱ्या बडनेरातील हॉलीक्रॉस हिंदी प्रायमरी शाळेतील मुख्याध्यापिकेसह सहायक शिक्षिकेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (दि.२५) ताब्यात घेतले. मुख्याध्यापिका संगिता फ्रान्सिस धनवटे (वय ४२, रा. टिचर क्वॉटर्स, बडनेरा, अमरावती) व सहाय्यक शिक्षक अश्विनी विजय देवतार (वय ३७, रा. भुमीपुत्र कॉलनी, अमरावती) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बडनेरा शहरातील एका व्यक्तीचा मुलगा बडनेरातील हॉली कॉस प्रायमरी हिंदी शाळेत तिस-या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळा ही खाजगी अनुदानित आहे. शाळेस शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळते, असे असतानाही तक्रारदार यांनी मुलाच्या शिक्षणाची वार्षिक फी १५५० रुपयांपैकी ८०० रुपये शाळेला यापूर्वी दिले होते. तर उर्वरित ७५० रुपये देणे बाकी होते. याबाबत शाळेच्या वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिका या तक्रारदाराच्या मुलास वारंवार उर्वरित फी ची मागणी करीत होते.
परंतु तक्रारदार यांना सदरची नियमबाहय फी देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची तक्रार २२ एप्रिलरोजी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे दिली होती. तक्रारीवरुन २३ एप्रिल रोजी एसीबी विभागाच्या अधिका-यांनी पडताळणी केली असता, वर्गशिक्षिका अश्विनी देवतार यांनी तक्रारदार यांना शाळेची नियमबाहय फी देण्याकरीता प्रोत्साहीत केल्याचे आढळून आले.
त्यानंतर एसीबी पथकाने २५ एप्रिलरोजी शासकीय पंचासमक्ष पडताळणी कारवाई केली असता, मुख्याध्यापिका संगिता धनवटे यांनी फीचे ७५० रुपये आणुन द्या, असे म्हणून शाळेची नियमबाहय फी म्हणून लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शविली. त्यानंतर एसीबी पथकाने बडनेरा येथील हॉलीक्रॉस हिन्दी प्रायमरी शाळेत सापळा रचून आरोपी लोकसेवक संगिता धनवटे यांना नियमबाहय फी ७५० रुपयांची लाच स्वीकारताना रक्कमेसह ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुध्द बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक भारत जाधव, केतन मांजरे, पोलीस अमंलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडु, चित्रा वानखेडे व चालक पोलिस हवालदार राजेश बहिरट यांनी केली.