

अमरावती : तपोवन येथील तरुणाची गळ्यावर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२३) बडनेरा ठाण्याच्या हद्दीत अंजनगाव बारी मार्गावर रामगिरी महाराज मंदिराजवळ उघडकीस आली. रोशन महेंद्रसिंग नाईक (वय २५, पंचशीलनगर, तपोवन) असे मृताचे नाव आहे.
शहरातील अंजनगाव बारी रोडवरील रामगिरी बाबा मंदिराजवळ मृतदेह आढळल्यावर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच बडनेराचे ठाणेदार सुनील चव्हाण यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, साहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान मृताच्या गळ्यावर व हातावर चाकूचे वार दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रोशनच्या हातावर आणि छातीवर महाकालचा टॅटू आहे. त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून मृतदेह अंजनगावबारी रस्त्यावर टाकल्याचा संशय बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला आहे. रोशनची हत्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बडनेरा पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.