

अमरावती : शहरातील सेवानिवृत्त न्यायाधीशाची तब्बल ३१ लाखांनी सायबर फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान घडली असून, ८ ऑक्टोबर रोजी ती समोर आली. या घटनेने कायद्याची पूर्ण जाण असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे फसविण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त न्यायाधीशांना २५ सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्या इसमाने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख दिली आणि त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगत आरोपींनी त्यांना घराबाहेर न जाण्याचा इशारा दिला.
पुढील काही दिवस आरोपींनी सतत संपर्क ठेवत ३१ लाख रुपयांची मागणी केली. आरोपींच्या धमक्यांमुळे न्यायाधीशांनी अखेर ३ ऑक्टोबर रोजी आरोपींनी दिलेल्या खात्यात ३१ लाख रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी त्यांना डिजिटल अरेस्ट संपल्याचे सांगून संपर्क तोडला.
घटनेचा विचार केल्यानंतर न्यायाधीशांच्या लक्षात आले की ते फसवले गेले आहेत. त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेत सायबर सेलला तपासाची सूचना केली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.