

Devendra Fadnavis Cousin Elected Corporator:
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेमधून अल्हाद कलोती यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली. उल्लाद कलोती हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आहेत. आपल्या मामेभावाची नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून त्यांचे अभिनंदन केलं. विशेष म्हणजे अल्लाद यांच्या रूपानं अमरावती जिल्ह्यात भाजपचा पहिला नगरसेवक हा बिनविरोध निवडून आला आहे.
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्याचा वेगळाच पॅटर्न दिसून येत आहे. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतमध्ये १७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. नाट्यमय राहिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील प्राजक्त पाटील बिनविरोध निवडून आल्या.
दरम्यान, आज अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ देखील बिनविरोध निवडून आले. त्यांच्या निवडीसाठी आमदार रवी राा यांनी पुढाकार घेतला होता. या निवडीनंतर फडणवीस यांनी मामेभावाला फोन लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ब मधून अल्हाद कलोती यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे चुलत मामेभाऊ म्हणून त्यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात रवी राणा अग्रस्थानी होते. या प्रभागातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यानं अल्हाद यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीनंतर रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यानंतर फडणवीस यांनी आपल्या मामेभावाचं अभिनंदन केलं. मात्र असं असलं तरी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस दमदाटी, गुंडगिरी करत आहेत. मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करत आहेत. उमेदवारांना धमक्या, पैसे दिले. त्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे असे आरोप ठाकूर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रुर मुख्यमंत्री असल्याची टीका देखील त्यांनी केली.