

अमरावती : शेतकर्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
गुरुकुंज मोझरी येथे आज शुक्रवारी (दि.१३) बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी आमदार प्रताप अडसड, चंदू यावलकर, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. प्रामुख्याने शेतकर्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत उच्च स्तरावर बैठकही घेण्यात आल्या आहे. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेताना शेवटच्या घटकातील एकही शेतकरी सुटू नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात येणार्या समितीच्या बैठकांना बच्चू कडू यांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांच्या सर्व सूचना आणि प्रस्तावांचा आग्रहपूर्वक समावेश केला जाईल. या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला राहील. त्यासोबतच येत्या खरीप हंगामासाठी कर्ज थकीत असलेल्या शेतकर्यांनाही कर्ज मिळणे गरजेचे आहे. या शेतकर्यांनाही नव्याने कर्ज मिळावे यासाठीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
आंदोलनात दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान वाढवावे, अशी महत्त्वाची मागणी आहे. याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करून निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून कोणत्याही योजनेत निधी देताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद असणे गरजेचे आहे. यामुळे अपंगांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होईल.
शेतकर्यांच्या संदर्भात असलेल्या पशुसंवर्धन, जलसंधारण, महसूल, पणन आदी मंत्र्यांशी चर्चा झाली असून याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. आंदोलनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण सोडावे, असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले.
पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केले. मागील ८ जून पासून प्रहार प्रमुख माजी आमदार बच्चू कडू जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांना घेऊन अन्नत्याग आंदोलनावर बसले आहे.