

विदर्भातील निसर्गरम्य चिखलदरा आता पर्यटकांसाठी आणखी आकर्षक बनणार आहे. ‘विदर्भाचे काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी भव्य काचेचा स्कायवॉक उभारण्याचे काम जलद गतीने सुरू झाले आहे. काचेच्या या स्कायवॉकवरून चालण्याचा थरार आणि मेळघाटच्या दऱ्याखोरींचे मनोहारी दृश्य एका वेगळ्या उंचीवरून पाहण्याचा रोमांच पर्यटकांना मिळणार आहे.
चिखलदऱ्यातील हा स्कायवॉक नेहमीचे पर्यटन अनुभव बदलून टाकणार आहे. कारण या स्कायवॉकची उंची बघितली तर ती तब्बल १,५०० फुटांवर असणार आहे. भारतात याआधी अशा प्रकारचा कोणताही स्कायवॉक नाही. त्यामुळे हा देशातील पहिला आणि लांबीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा स्कायवॉक ठरणार आहे.
सध्या जगात स्वित्झर्लंड आणि चीन या दोन देशांमध्ये काचेचे स्कायवॉक आहेत. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक 397 मीटर तर चीनचा 360 मीटर आहे. पण चिखलदऱ्यात उभारत असलेला हा स्कायवॉक ५०० मीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे तो एकाच वेळी जगातील तिसरा आणि सर्वांत मोठा स्कायवॉक ठरेल.
चिखलदरा पर्यटन विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश असून गोराघाट पॉइंटपासून हरिकेन पॉइंटपर्यंत हा काचा स्कायवॉक बांधला जात आहे. दोन उंच टेकड्यांना काचेच्या पूलाने जोडले जात असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव आणखी खास होणार आहे.
या स्कायवॉकवरून फिरताना खाली पारदर्शक काचेमधून दरी आणि घनदाट जंगल दिसणार असल्याने अनेकांना अक्षरशः हृदयाचा ठोका चुकल्यासारखे वाटेल. पण त्याचबरोबर मेळघाटच्या अप्रतिम निसर्गाचे दर्शन उंचावरून घेण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे.
सिडकोचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जामनेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्कायवॉकला 34 कोटींचे बजेट मंजूर असून साधारण दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे काही काळ प्रकल्प अडकला होता, मात्र यानंतर सर्व कामे पुन्हा सुरळीत सुरू झाली आहेत.
चिखलदरा स्वतःमध्येच एक लोकप्रिय पर्यटनस्थळ. गाविलगड किल्ला, भीमकुंड, कीचकदरी, पंचबोल पॉइंट, सनसेट पॉइंट, याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. आता या यादीत काचेचा स्कायवॉकही समाविष्ट होत असल्याने चिखलदऱ्याचे पर्यटन आणखी उज्वल होणार आहे.