

Arun Sapkal Bail Rejected
अमरावती : वसतीगृहातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अरुण सिंधुताई हरबाजी सपकाळ असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. चिखलदारा येथील वसतीगृहातील अल्पवयीन मुलगी १७ ऑक्टोबर रोजी स्वयंपाक घरात काही काम करीत होती.
दरम्यान, वसतीगृहाचा सचिव सिंधुताई सपकाळ यांचा मानसपुत्र अरुण सपकाळ स्वयंपाक घरात आला आणि मुलीसोबत त्याने अश्लिल चाळे केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दुसर्याच दिवशी तिचे आई-वडील वसतीगृहात पोहचले आणि संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
त्या आधारावर पोलिसांनी अरुण सपकाळविरुध्द विनयभंग, पोक्सो आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून सपकाळ चिखलदर्यातून पसार आहे. दरम्यान त्याच्या वकीलाने जामीनाकरीता येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी संबंधित अर्ज न्यायालयाने युक्तिवाद ऐकून फेटाळून लावला. चिखलदरा पोलीस अरुण सपकाळच्या शोधात आहेत.