

Warud Money Dispute Brother Murdered
अमरावती : पैशांच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर सख्ख्या भावानेच आपल्या भावाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड शहरात पारडी चौक परिसरात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचाराअभावी घरीच मृत्यू झाला.
या प्रकरणी वरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला अटक केली आहे. गजानन अनिल काळे (वय ३८) आणि मोहन अनिल काळे (वय ३५) हे दोघे भाऊ पारडी चौक परिसरात अनेक वर्षांपासून राहत होते. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मोहन याने गजाननला शिवीगाळ केल्यानंतर संतप्त झालेल्या गजाननने मोहनला एका खोलीत डांबले. त्यानंतर लोखंडी सळईने त्याच्यावर वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत मोहन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे उपचार न झाल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यात आले.
दरम्यान, रात्री उशिरा मोहनचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना उघडकीस आली. घटनेची तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती. मोहनची पत्नी काजल गेल्या दोन वर्षांपासून माहेरी राहत होती. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच ती वरूड येथे परतली आणि तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन काळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरूड पोलीस करीत आहेत.