Amravati Tiger Attack : मोर्शीनंतर आता सोनोरीत थरार! नरभक्षक वाघिणीच्या हल्ल्यात तरुणी ठार, संतप्त गावकऱ्यांचा वन विभागावर रोष

झाडावरून खाली खेचले अन्...; शेतात गेलेल्या १८ वर्षांच्या उर्मिलाचा वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी अंत
Amravati Tiger Attack : मोर्शीनंतर आता सोनोरीत थरार! नरभक्षक वाघिणीच्या हल्ल्यात तरुणी ठार, संतप्त गावकऱ्यांचा वन विभागावर रोष
Published on
Updated on

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात सोनोरी येथे वाघिणीच्या हल्ल्यात रविवारी (दि. ६) एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोर्शी तालुक्यातून मार्गक्रमण करत आलेल्या या वाघिणीमुळे सोनोरी आणि परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनोरी येथील उर्मिला बाजीराव इवाने (वय १८) ही तरुणी आपल्या आईसोबत गावाजवळील शेतात शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेली होती. चारा कापताना उर्मिला आणि तिच्या आईला वाघीण अचानक त्यांच्या दिशेने येताना दिसली. वाघीण अगदी जवळ आल्याचे पाहून आई जिवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळाली. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी तातडीने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघिणीने तिला झाडावरून खाली खेचून तिच्यावर हल्ला केला आणि सुमारे १५ ते २० फूट झुडपांमध्ये फरफटत नेले. मुलीच्या आईने गावात जाऊन आरडाओरड केल्यावर नागरिक शेताकडे धावले. गावकऱ्यांचा गोंधळ ऐकून वाघीण पळून गेली, मात्र तोपर्यंत या तरुणीचा मृत्यू झाला होता.

ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून या परिसरात फिरत असून, तिने यापूर्वी मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करत ती चांदूर बाजार तालुक्यात दाखल झाली. दोन दिवसांपूर्वी रिद्धपूर शेतशिवारात एका गायीवर हल्ला केल्यानंतर, रविवारी सकाळी जालनापूर रस्त्यालगत ही वाघीण चालताना दिसून आली होती. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास सोनोरी येथील झुडपी जंगलात या वाघिणीने दोन शेळ्यांची शिकार केली.

सकाळी शेळ्यांची शिकार आणि सायंकाळी तरुणीचा बळी गेल्यामुळे सोनोरी परिसरातील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजार आणि ब्राह्मणवाडा थडी पोलिसांचा ताफा तसेच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभाग आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ही दुर्घटना घडल्याने संतप्त जमावाने वन विभागाच्या वाहनांची तोडफोड केली. या नरभक्षक वाघिणीला तातडीने जेरबंद किंवा ठार करण्याची तीव्र मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news