

अमरावती : वलगाव येथे रविवारी (१९ जुलै) रात्री उशिरा घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बस स्टँड परिसराजवळ जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यात दोन जिवलग मित्र संजोग विकास जोशी (वय २४, रा. वलगाव) आणि ऋतिक बाबलू पंडित (वय २४, रा. महाजनपुरा, अमरावती) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर विशेष मोहीम राबवत पाच आरोपींना भातकुली बस स्टँड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
विकी उर्फ गोलू विकास उगले (वय २१), मिलन गोपालराव तायडे (वय २१), अजय दिलीपराव नागदिवे (वय २१), अनिकेत विशाल मेश्राम (वय २५) व सुमित सुधाकर सुरजुसे (वय १९, सर्व रा. वलगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास संजोग आणि ऋतिक हे दोन्ही मित्र वलगाव बस स्टँड परिसरात थांबले होते. या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या चार युवकांसोबत त्यांची जुन्या कारणावरून बाचाबाची सुरू झाली. पाहता-पाहता या वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले. आरोपींनी आपल्याजवळील धारदार शस्त्र व चाकू काढून एका युवकावर वार केले. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्रावरही हल्लेखोरांनी बेछूट वार केले, ज्यामुळे दोन्ही तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी स्थितीत रस्त्यावर कोसळले. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही गंभीर जखमी तरुणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच अमरावती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, एसीपी निलेश ब्राह्मणे यांच्यासह वलगावच्या ठाणेदार रिता उईके व स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाली. वाढलेला तणाव व नागरिकांची गर्दी पाहता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली असून, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी रात्रभर विशेष मोहीम राबवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संजोग जोशीच्या आजीने वलगाव ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी संजोग आणि ऋतिक घरी होते. त्यावेळी आरोपी गोलू उगले, मिलिंद तायडे, अजय नागदिवे व सुमित सुरजुसे त्यांच्या घरी आले आणि ते संजोग व ऋतिकला सोबत घेऊन गेले. आजीने हटकले असता 'थोड्या वेळात आम्ही परत येतो' असे गोलू उगले म्हणाला. यानंतर रात्री साडेअकरा वाजता दोघांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे, यशवंत सोळंके, गुन्हे शाखेच्या उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पो.नि. दिनेश दहातोंडे, गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी पो.नि. अतुल वर, वलगाव ठाण्याच्या पो.नि. रिता उईके यांच्या नेतृत्वात सपोनि मनीष वाकोडे, सपोनि महेश इंगोले, सपोनि दशरथ आडे, पोउपनि गजानन सोनुने यांच्यासह सुनील लासुरकर, फिरोज खान, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, संभाजी केंद्रे, मनोज ठोसर, मंगेश परिमल, सचिन बहाळे, आस्तिक देशमुख, मंगेश लोखंडे, जहीर शेख, संजय भारसाकळे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सय्यद, अतुल संभे, विकास गुढधे, विशाल वाकपांजर, रणजीत गावंडे, नरेश मोहरील, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, चेतन गुल्हाणे, रोशन लकडे, संदीप खांडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा, राहुल दुधे तसेच वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.