

अमरावती : गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत खोंगडा वर्तुळातील धामणीखेडा बीट कंपार्टमेंट नं. ९४४ मध्ये घडली आहे. गस्त करीत असताना मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तारूबांधा येथील वनमजूर प्रेम मुन्ना कासदेकर (वय ३०) याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. तर सोबत असलेला आकाश कास्देकर सुदैवाने वाचला. या हल्ल्यामुळे तारूबांधा परिसरातील ८ ते १० गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, चिखलदरा अंतर्गत खोंगडा वर्तुळात राजदेवबाबा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये संपूर्ण जंगलाची पाहणी करण्यासाठी वनरक्षक व वनमजूर मुक्कामी राहतात. प्रेम मुन्ना कासदेकर व आकाश दयाराम कासदेकर हे दोघे रोजंदारी वनमजूर म्हणून राजदेव बाबा कॅम्पमध्ये गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत होते. मंगळवारी (दि.२) सकाळी सात वाजता पासून प्रेम कासदेकर व आकाश कासदेकर धामणीखेडा बीट मध्ये गस्तीवर गेले होते.
दिवसभर त्यांनी काळीकुंडी कॅम्प व धामणीखेडा बीटची पाहणी केली. सायंकाळी सातच्या सुमारास दोघे आपल्या बीटकडे परत येत होते. आकाश समोर होता आणि प्रेम मागे येत होता. थोड्या वेळानंतर प्रेमचा आवाज बंद झाला. यामुळे आकाशने वळून पाहिले तर त्याला प्रेम कुठेही दिसला नाही. आकाशने जोर जोराने हाक मारली पण कोणताही प्रतिसाद त्याला मिळाला नाही. अंधार झाल्याने तो राजदेव बाबा कॅम्पकडे धावत आला.
वनरक्षक व वरिष्ठांना त्याने घटनेची माहिती दिली. रात्री अकराच्या सुमारास वनरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांसह कर्मचारी प्रेमच्या शोधात निघाले. पण प्रेम कुठेच मिळाला नाही. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा प्रेम कास्देकरला शोधण्यासाठी मोहीम प्रारंभ करण्यात आली. त्यावेळी एका झुडपात प्रेमचा मृतदेह दिसला. त्याच्या शरीरावर वाघाने ओरबडल्याचे निशाण तसेच एक हात नसल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह कंपार्टमेंट ९४४ मध्ये सापडला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
यावेळी वन विभाग सहाय्यक वनरक्षक प्राची उरडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनमजूर उपस्थित होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार केवलराम काळे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक दिशा निर्देश दिले. दरम्यान, गावकर्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.