

अमरावती : अचलपूर येथील झाशी राणी चौक ते अंजनगाव रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या शेती परिसरात केळीच्या बागेत (दि.१) दुपारच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
केळीच्या शेतात मिळालेला सांगाडा कुजलेल्या अवस्थेत होता. केवळ हाडे शिल्लक असल्याने मृत्यूला बराच काळ लोटल्याचे स्पष्ट होते. घटनास्थळी आढळलेल्या साडीवरून हा सांगाडा महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, याच रंगाची साडी घातलेली एक महिला काही दिवसांपूर्वी परिसरात वारंवार दिसत होती. ती महिला कुष्ठरोगाने पीडित असून तिच्या पायाला गंभीर जखमा होत्या.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ही महिला नगरपालिकेच्या निराधार आश्रमात दाखल होती. मात्र तेथून ती निघून गेल्याचे समजते. गेल्या २०-२५ दिवसांपासून ती दिसली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे हा सांगाडा त्याच महिलेचा असावा का, याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सांगाडा तपासासाठी पाठविण्यात आला आहे. मृत्यूचे खरे कारण हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.