

Teosa Police Banned Gutkha Seized
अमरावती : अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तिवसा तालुक्यात धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप जप्त केली. नागपूरहून ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा तब्बल ३९ लाख रुपयांचा गुटखा आणि १६ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल (दि.१३) जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुटखा पुरवठा साखळीबाबतही चौकशी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून एमएच-०१-सीव्ही-६२८२ क्रमांकाच्या ट्रकमधून नागपूरहून प्रतिबंधित गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे नागपूर-अमरावती महामार्गावरील सुमित हॉटेलजवळ सापळा रचून ट्रक अडविण्यात आला. झडतीदरम्यान ट्रकमध्ये ‘बाजीराव’ सुगंधित पानमसाला आणि ‘मस्तानी’ सुगंधित तंबाखू भरलेली १३० मोठी नायलॉन पोती आढळून आली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण माल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला.
या कारवाईत अब्दुल रफिक अब्दुल शब्बीर (वय ३५, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) आणि अर्शद खान रहमत खान (वय ३०, रा. ताजनगर, पठाण चौक, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमरावती जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही विविध मार्गांनी गुटख्याची तस्करी होत असल्याचे वारंवार उघड होत आहे. त्यामुळे या अवैध साखळीतील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि वितरण जाळ्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, निलेश डांगोरे, पंकज फाटे आणि चालक प्रशिक वानखडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.