

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शनिवारी शिपगाव परिसरात ४५ वर्षीय शेतमजूर संजय प्रभाकर मालधुरे यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह झुडपांमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहावरील गंभीर जखमांमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संजय मालधुरे हे रोजंदारीवर शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या हत्येमागील कारण काय, याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश खेडकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. तपासादरम्यान मृतदेहावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा दिसून आल्याचे समजते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांकडून मृताच्या हालचाली, वैयक्तिक संबंध आणि अलीकडील वादविवाद यांचा तपास केला जात आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हत्येचा उलगडा करण्यासाठी लोणी पोलीस विविध अंगांनी तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे. हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांसह शेजारी, मित्रमंडळी आणि परिसरातील काही व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.