

Amravati Police Interstate Action
अमरावती: शहरातील एका व्यापाऱ्याची लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील एकाला अमरावती सायबर पोलिसांनी झारखंडमधील जामतारा जिल्ह्यातून अटक केली आहे. नळ कनेक्शन तोडण्याची धमकी देत मोबाईलमध्ये घातक फाईल पाठवून ही फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात १६ लाख ५३ हजार ३१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात श्री राधे ऑइल मिलच्या संचालकांनी ९ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांच्या मोबाईलवर अधिकृत असल्याचा भास निर्माण करणारा संदेश प्राप्त झाला होता. संदेशासोबत पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडताच मोबाईलवर सायबर हल्ला झाला आणि काही वेळातच बँक खात्यातून मोठी रक्कम काढून घेण्यात आली. सायबर पोलिसांच्या तपासात ही रक्कम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विविध खात्यांत वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
एजंटमार्फत ही रक्कम झारखंडमधील मृणाल बाळीचंद्र पांडे याच्यापर्यंत पोहोचविण्यात आली असून, त्याने ती स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची लोकेशन जामतारा जिल्ह्यातील हरिखाना परिसरात निश्चित करण्यात आले. त्यानंतर अमरावती सायबर पोलिसांच्या पथकाने डूंबरिया चौक परिसरात कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
अटकेवेळी त्याच्याकडून मोबाईल फोन, डेबिट कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे तसेच १४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिकेत कासार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात विशाल यादव रोशन, अनिकेत वानखडे व अश्विन यादव यांचा समावेश होता.