

Amravati Nagpur highway bus collision
वर्धा : अनियंत्रित झालेल्या शिवाई बसने रोड रोलरला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दहा जण जखमी झाले. अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला उतरली. अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चिस्तूर शिवारात हा अपघात १० डिसेंबररोजी दुपारच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथून एम एच ४९ बी झेड ६८३६ क्रमांकाची शिवाई बस नागपूरला प्रवासी घेऊन जात होती. यावेळी रोलर चिस्तूर वरून तळेगावकडे जात होते. चिस्तूर शिवारात मागावून येणाऱ्या शिवाई बसने रोड रोलरला जबर धडक दिली. अपघातात रोड रोलर चालक, बस चालक वाहक, तसेच प्रवासी असे १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाच्या कडेला उतरली. जखमींना पोलीस व नागरिकांच्या मदतीने तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तळेगाव (श्या. पंत) पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. घटनेची नोंद तळेगाव (श्या. पंत) पोलिसांनी केली. पुढील तपास ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.