

Amravati Municipal Corporation Election
अमरावती : अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 87 जागेसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान पार पडत आहे. दरम्यान अमरावतीच्या माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांनी लक्ष्मी नगर येथे मतदान केले.
रवी राणा हे चक्क मतदान करण्यासाठी सायकलने पोहोचल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरण आणि अमरावती शहरासाठी आपण सायकल वरून मतदान केंद्र गाठल्याचे रवी राणा यांनी सांगितले. तर नवनीत राणा यांनी देखील रांगेत उभे राहून मतदानाचा अधिकार बजावला. तिळगुळ घ्या आणि पाठीमागे देखील गोड गोड बोला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
या निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपमध्ये राहूनच भाजपच्या काही नेत्यांना निवडणुकीत आव्हान दिल्याचे दिसून आले होते. लोकसभेत त्यांचा पराभव करणाऱ्यांचा महापालिका निवडणुकीत आपण पराभव करणार, असा इशाराही त्यांनी दिला होता. तर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची भाजप सोबतची युती महापालिका निवडणुकीत तुटण्याला भाजप नेत्या नवनीत राणा यांचे जाहीर सभेतील वक्तव्य कारणीभूत ठरल्याचे देखील बोलले जात आहे.