

Melghat Dharni Sub-District Hospital
अमरावती : मेळघाटमधील धारणी उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी एकाच दिवसात तीन बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वीच कुपोषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले असताना आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा आदिवासी बालकांसह मातांच्या जिवावर बेतणारा ठरला आहे.
नर्मदा चिलात्रे या महिलेची प्रसूती होत नसल्याने सिजरसाठी नेण्यात आले असता तिला झटके आले. उपचार करण्यात आला. परत दोनवेळा झटके आले आणि प्रकृती खालावली. प्रसूतीपूर्वीच माता दगावली. तर बाळ पोटातच दगावले.
धुळघाट रेल्वे येथील कविता धांडे हिने जुळ्या मुलगी आणि मुलाला जन्म दिला. परंतु, नवजात एका मुलाचा जन्मानंतर काही वेळातच मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत बैरागड येथील सबा तनवीर मो. नदीम हिची केवळ २८ आठवड्यांवर प्रसूती झाली. अकाली झालेल्या या प्रसूतीत सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे मूल जन्माला आले. अत्यल्प वजन आणि नाजूक प्रकृतीमुळे वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्या बालकाचा मृत्यू झाला.
मेळघाट मध्ये शासकीय यंत्रणा काय करत आहे? त्यांचे लक्ष नाही का? गर्भवती माता बालकांना सकस आहार दिला जात नाही का? यंत्रणा कुठे गेली, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.