MLC Election | विधान परिषद : महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राहुल गांधी रिजेक्टेड माल असल्याचा पुनरुच्चार
MLC Election
MLC Election pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून निर्णय करावा, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही वेगवेगळ्या निकषांवर चर्चा करत असून, या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितच लढतील असा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुका, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुक या मुद्द्यांवर फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना भाष्य केले.

होय, राहुल रिजेक्टेड

पंतप्रधान परदेशात जाऊन देशाच्या हिताचे काम करत असल्याने त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. तसेच, मागच्या वेळी आपण राहुल गांधींविषयी बोललो तेव्हा शरद पवार यांना फार राग आला होता; पण आपण पुन्हा सांगतो की, हा रिजेक्टेड माल आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळाने घेतलेले 92 टक्के निर्णय पूर्ण

मंत्रिमंडळाने घेतलेले 92 टक्के निर्णय पूर्ण कार्यान्वित झाले असून, उर्वरित 8 टक्के निर्णयांपैकी काही निर्णय राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. तर, काही निर्णयांवर अजून काम सुरू आहे; पण एकूणच प्रगती चांगली आहे, असेही ते म्हणाले.

शिंदे शिवसेना 6 जागांवर आग्रही; भाजप 3 जागा देण्यास तयार

विधान परिषद निवडणूक समन्वयाने लढावी, असा भाजपचा प्रयत्न असतानाच शिवसेना शिंदे गटाने मात्र सहा जागा मिळायलाच हव्यात, असा आग्रह धरला आहे.शिंदे गटाला फार तर तीन जागा देणे योग्य ठरेल, असे भाजपमधील उदारमतवादी गटाला वाटत असताना पाच जागांची मागणी काहीसा तणाव निर्माण करणारी ठरेल, अशी चर्चा आहे.

भाजप 12, शिंदे सेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा ः चर्चेतील फॉर्म्युला

महायुतीतील घटकपक्षांच्या ताकदीनुसार भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतील 12 जागा लढाव्यात, तर शिवसेना शिंदे गटाने 3 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2 जागा लढाव्यात, अशी प्रारंभिक चर्चा झाली आहे. शिंदे गटाची इच्छा सहा जागा लढण्याची आहे. त्यामुळे हा आकडा त्यांना मान्य होणे शक्य नाही, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद नसताना त्यांना दोन जागा देणे योग्य होणार नाही, असेही काहींचे मत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुंबईत गर्दी झाली आहे. प्रत्येकजण आपापली स्थानिक समीकरणे मांडून संधी मिळाली तर जिंकू, असे सांगत आहे.

महामंडळ जागावाटपाचे सूत्र!

निवडून आलेल्या जागांनुसार महामंडळातील 48 टक्के जागा भाजपला, शिवसेना शिंदे गटाला 29 टक्के, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के जागा दिल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news