

PWD Negligence Fire Audit
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी २५ जून रोजी पीडब्ल्यूडीला पत्र दिले होते. त्यानंतर १७ जुलै रोजी स्मरणपत्रही पाठवले. तरीही तब्बल ३७ दिवस या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी रुग्णालयाच्या एका कक्षात वॉशिंग मशिन जळून खाक झाली होती. कर्मचार्यांनी ही घटना वरिष्ठांपासून लपवून ठेवली. त्यावेळी जर विद्युत यंत्रणेची तपासणी झाली असती, तर संभाव्य धोका उघडकीस येऊ शकला असता. दरम्यान सोमवारी पहाटे अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला.
मात्र, अग्निशमन यंत्रणेचा अलार्म वाजलाच नाही. त्यामुळे आग आणि धूर पसरल्यानंतरच हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे या घटनेला अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरला आहे.
अवघ्या आठ महिन्यांपूर्वी नागपूर येथील कंपनीकडून आणलेल्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने उपकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.