Amravati Hospital Fire Case | रुग्णालये की लाक्षागृहे?

Amravati Hospital Fire Case |
Amravati Hospital Fire Case | रुग्णालये की लाक्षागृहे?(Pudhari File Photo)
Published on
Updated on

अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशू उपचार कक्षातील अग्‍निकांडाने पुन्हा एकदा लोकांच्या जीवाशी निगडित सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामधील ढिसाळपणा, बेजाबदारपणा आणि गांभीर्यरहित व्यवस्थापनाचे दर्शन घडले. ज्या रुग्णालयात अत्यवस्थ, अकाली जन्मलेली आणि कमी वजनाची बाळे जगण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेच्या साहाय्याने दाराशी येऊन ठेपलेल्या मरणाशी झुंज देत असतात, तिथेच त्यांच्या जीविताला आग, धूर आणि सदोष यंत्रणांचा धोका निर्माण व्हावा, यासारखा मोठा विरोधाभास दुसरा कोणता? या आगीत तीन चिमुकले जीव जग पाहण्याआधीच होरपळून गेले. अशा दुर्घटनेनंतर चौकशी, जबाबदारी निश्चित करण्याच्या घोषणा आणि अग्‍निसुरक्षा तपासणी आदेशाचे सोपस्कार याहीवेळी पार पडले; पण काही काळाने ते विस्मरणात जाते आणि पुढील दुर्घटना घडल्यानंतरच त्यांची उजळणी होते, हा व्यवस्थेचा अलिखित स्वभाव बनला आहे. या दुष्टचक्रातून आरोग्य व्यवस्था बाहेर कधी पडणार, हा या दुर्घटनेने उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे. सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे. हा विशेष नवजात शिशू उपचार कक्ष जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीत नव्हता.

नव्या इमारतीत वर्षभरापूर्वी सुरू केला होता. त्यामुळे जुन्या विद्युतवाहिन्या, कालबाह्य बांधकाम किंवा वर्षानुवर्षे न बदललेली सुरक्षा व्यवस्था अशी नेहमीची कारणे पुढे करून प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही. नव्या इमारतीत आधुनिक वैद्यकीय सुविधा असताना अग्‍निशमन यंत्रणा कितपत सक्षम होती, तिची नियमित चाचणी झाली होती का, आग लागल्यानंतर ती तत्काळ कार्यान्वित का झाली नाही, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, विद्युतभाराचे परीक्षण झाले होते का आणि उपकरणांची देखभाल वेळेवर केली होती का, या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधले गेले पाहिजे आणि ही माहिती कसलाही आडपडदा न ठेवता जनतेसमोर आली पाहिजे. रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्टला संपल्यावर ते तत्काळ करून घेण्याच्या सूचना प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी गेल्या महिन्यातच दिल्या होत्या. हे खरे असल्यास चौकशी समितीचा फार्स करण्याआधी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे. रुग्णालय ही मानवी असुरक्षिततेला सुरक्षिततेचे कवच देणारी संस्था असते. तेथे रुग्ण स्वतःच्या जीवाची जबाबदारी वैद्यकीय व्यवस्थेकडे सोपवत असतात. नवजात बालकांबाबत तर हा विश्वास अधिकच निरपेक्ष असतो. त्यामुळे उपचारांतील चूक आणि उपचारांच्या जागी असणारी असुरक्षितता यात मूलभूत फरक आहे.

वैद्यकशास्त्राला प्रत्येक जीव वाचविता येईलच, असे नाही. परंतु, आग, सदोष वीज यंत्रणा, निकामी सुरक्षा प्रणाली किंवा प्रशासकीय बेफिकिरीमुळे जीव जाणार नाही, एवढी हमी आधुनिक आरोग्य व्यवस्थेने दिलीच पाहिजे. किंबहुना, ती घटनात्मक जबाबदारी आहे. रुग्णालये, डॉक्टर यांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीशिवाय अपेक्षित परिणाम साध्य होणे कदापि शक्य नाही. त्यासाठी प्रत्येक सुविधेमागे उत्तरदायित्व, नियमित देखभाल आणि संभाव्य संकटाचा आधीच विचार करणारी सुरक्षा संस्कृती गरजेची आहे. कारण, दुर्घटना अचानक घडत असली तरी तिच्यामागील निष्काळजीपणा दीर्घकाळ साचत गेलेला असतो. नवजात अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेटर, वॉर्मर, इन्क्युबेटर, मॉनिटर, इन्फ्युजन पंप आणि इतर विद्युत उपकरणे असतात आणि ऑक्सिजनचा वापरही मोठा होतो. येथे किरकोळ ठिणगीदेखील गंभीर संकटाचे रूप धारण करू शकते.

अशा विभागात अग्‍निसुरक्षा ही भिंतीवरचा अग्‍निशमन सिलिंडर व्यवस्थित आहे ना, एवढ्यावर विसंबून ठेवून चालत नाही. विद्युतभाराचे नियोजन, स्वतंत्र विद्युत सुरक्षा तपासणी, धूर शोधणारी यंत्रणा, स्वयंचलित इशारा प्रणाली, आपत्कालीन विद्युतपुरवठा बंद करण्याची व्यवस्था, सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग आणि कर्मचाऱ्यांचे नियमित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने बाळांना बाहेर काढल्यामुळे दुर्घटनेची व्याप्ती वाढली नाही. जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या शौर्याला सलाम; पण रुग्णालयाची सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या धाडसावर अवलंबून असून चालणार नाही. आग लागल्यानंतर माणसांनी जीव धोक्यात घालून रुग्ण वाचविणे ही शेवटची व्यवस्था असते; पहिली व्यवस्था आग लागू न देणे आणि लागल्यास ती काही क्षणात शोधून नियंत्रित करणारी यंत्रणा, हीच असली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news