

Dufferin Hospital Amravati Fire News
अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरिन रुग्णालय) नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU/NICU) सोमवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत धुरामुळे गुदमरून आणि होरपळून ३ नवजात बालकांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. तर दुसरीकडे, आगीचे तांडव आणि धुराचे लोट पसरले असताना रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘एसएनसीयू’ विभागात व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण कक्षात वेगाने आग पसरली आणि दाट धुराचे लोळ निघू लागले.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात एकूण तीन कक्ष असून, या कक्षांमध्ये ३९ बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. घटनेच्या वेळी या विभागात एकूण ३९ मुले उपचारासाठी दाखल होती. ज्या कक्षात आग लागली, तेथे १२ नवजात बालके उपचार घेत होती.
आग लागल्याचे समजताच आणि धुराचे लोट दिसताच ऑन-ड्यूटी असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकच धावपळ करत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. धुरामुळे श्वास घेणे कठीण झाले असतानाही कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून बालकांना एकामागोमाग एक बाहेर काढले.
कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे ३६ बालकांचे प्राण वाचले. यातील जखमी झालेल्या बालकांना तात्काळ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) व पीडीएमसी (PDMC) रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाच्या परिसरात पालकांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. "आमचे बाळ आम्हाला परत द्या!" असा आक्रोश करत अनेक माता आणि पालकांनी रुग्णालयाबाहेर हंबरडा फोडला. आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने पालकांची प्रचंड धावपळ झाली व वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.