

अमरावती : अल्पवयीन मुलीला आजीकडे सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना चांदूर रेल्वे तालुक्यात घडली होती. जून २०२४ मधील या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला असून, जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ५ च्या न्यायाधीश एस. एम. कनकदंडे यांनी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शिवाजी बंडू चौधरी आणि राजेश ऊर्फ राजा शंकरराव कोहळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. चांदूर रेल्वे परिसरात २९ जून २०२४ रोजी ही घटना घडली. घटनेच्या दिवशी पीडिता आणि तिची मोठी बहीण घरी होत्या. याचवेळी राजेश ऊर्फ राजा कोहळे त्यांच्या घरी आला. आई-वडील घरी नसल्याची खात्री केल्यानंतर त्याने अन्य आरोपींना फोन करून बोलावले. काही वेळाने पीडितेच्या बहिणीने तिला पाच रुपये देऊन दुकानातून चिप्स आणण्यासाठी पाठविले.
पीडिता दुकानाकडे जात असताना शिवाजी चौधरी याने तिला रस्त्यात अडविले. आजीकडे सोडून देण्याचे सांगत त्याने तिला दुचाकीवर बसविले आणि गावातील तलावावर नेले. तेथे अन्य आरोपीही पोहोचले. त्यानंतर शिवाजी चौधरी आणि राजेश कोहळे यांनी पीडितेला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. घटनेनंतर पीडिता आणि तिचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात होते. त्यामुळे तातडीने पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही. अखेर ५ जुलै २०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे या घटनेची माहिती पोहोचली. त्यानंतर चौकशी करण्यात आली आणि पीडितेच्या मोठ्या बहिणीने तक्रार दाखल केली. चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
१४ साक्षीदारांची तपासणी; दोघे फितूर
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. त्यापैकी दोन साक्षीदार फितूर झाले. मात्र, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे न्यायालयाने दोन आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्याचे मान्य केले. पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोघांना जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. अपहरण तसेच अॅक्ट्रॉसिटी कायद्यांतर्गतही विविध कलमांनुसार कारावास व दंडाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींची संशयाचा फायदा देऊन मुक्तता करण्यात आली.
पीडितेला नुकसानभरपाईचेही आदेश-
न्यायालयाने विविधकलमांनुसार ठोठावलेल्या दंडाची एकूण रक्कम ९० हजार रुपये असून, अपील कालावधी संपल्यानंतर ती पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्र पीडित नुकसानभरपाई योजनेअंतर्गत पीडितेला योग्य नुकसानभरपाई देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. मंगेश भागवत यांनी बाजू मांडली. तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, चांदूर रेल्वेचे तत्कालीन ठाणेदार मंगेश मोहोड, जिल्हा पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहन दुधे आणि महिला पोलीस शिपाई सोनल कुमरे यांनी सहकार्य केले.