

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: दर्यापूर-अकोला मार्गावर लासुरजवळ २ चार चाकी वाहनांच्या समारोसमोर झालेल्या धडकेत तिघे जागीच ठार झाले. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सोमवारी (दि.२) दुपारी तीनच्या दरम्यान झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने दर्यापूर शहरातील आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, (एम एच 29 बीसी 77 86) ही कार अकोलाकडून दर्यापूरकडे येत होते. तर दर्यापूर येथून अकोलाच्या दिशेने (एम एच 27 डीई 62 60) ही कार जात होती. यावेळी लासुरजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. ही अपघात एवढा भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक बोचे, विनीत बिजवे, आनंद उर्फ गोलू बाहकर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तिघेही दर्यापूर येथील रहिवासी आहे.
जखमी असलेल्या चौघांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असून घटनेनंतर मार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच येवदा आणि दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयात पाठविले. मृतांच्या नातेवाईकांनी दर्यापूर रुग्णालयात एकच गर्दी करून आक्रोश केला. भीषण अपघातात एकाच शहरातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे.