

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: एकनाथ शिंदे हे प्रगल्भ आहेत. महायुतीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे ते नाराज नाहीत. शिंदे महायुतीला मजबूत करण्याचे काम करत असून त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. आम्हाला कुठल्याही गटबाजीत पडायचे नाही, असे स्पष्टीकरण भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत (दि.22)दिले आहे.
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. नागपूरातील त्यांचे एक वक्तव्य देखील सध्या चांगलेच चर्चेत आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांसोबत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. आता राजकारण नव्हे तर लोकांना जी आश्वासने दिली ती आम्हाला पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित व्हावा म्हणून महायुती काम करत आहे,असेही ते म्हणाले.
दरम्यान अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संदर्भात विचारले असता बावनकुळे म्हणाले की, अण्णा हजारे यांच्या मागणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार नक्कीच ऐकून घेईल आणि निर्णय घेईल.
यासह आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असून यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले कि, राज ठाकरे यांचे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. ते सर्वांचे मित्र आहेत. माझेही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच अशा भेटी होत राहतात.