

Car collision Amaravati Teacher killed
अमरावती : मार्डी मार्गावर अच्युत महाराज हॉस्पिटलजवळ दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक निवृत शिक्षक गंभीर जखमी झाले.
लाळेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक पंकज खुशालराव मेश्राम (वय ३६, रा. तपोवन) आणि त्याच शाळेत सेवा देणार्या शिक्षिका वासंती अनिल सरोदे (वय ५६, रा. अर्जुन नगर) हे शाळा सुटल्यानंतर आपल्या कारने अमरावतीकडे परत येत होते. त्याचदरम्यान समोरून वेगाने येणार्या कारची त्यांच्या वाहनाशी जोरदार धडक झाली.
यात दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत शिक्षिका वासंती यांच्या मागच्या सीटवर बसलेले पती अनिल पंजाबराव सरोदे (निवृत्त शिक्षक) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तर दुसऱ्या कारमधील तिघे युवक गोपाल रामकृष्ण तराळे (वय २५), ऋषिकेश दीपकराव बोंदरे (वय २४) व प्रतीक महेंद्र वाघमारे (तिघेही रा. मोरंगना) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी अधिक होती की, दोन्ही कारचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.